तुझी आठवण
गतकाळाच्या पडद्या आडून
अशी तुझी आठवण आली
जळाजळातून, कणाकणातून
नसेल जरी, तरी वाटले
अंतरातून तुझी आठवण आली
आली धावून, आतुर होऊन
उभी राहिली पसरून बहु
जरा बावरत, तरी सावरत
डुंबत डुंबत, जरा तरंगत
जशी एरवी येते अकाली,
तशी आज ही अलगद आली
इवल्या इवल्या पावलांनी
चंद्रधनुंच्या सावल्यांनी
खेळत झिम्मा, घालत फुगडी
घेत स्वताशीच फेरी
लगबगीने निघावी
नववधुच जणू माहेरी
गंधातूर वेणीत जणू,
कुणी माळव्यात जशा फुलवेली
गतकाळाच्या पडद्या आडून
तशी तुझी आठवण आली
.
0 comments:
Post a Comment