गणपती बाप्पा ...!



परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत

इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?

असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको

माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस

सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं

पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत जिथे आहे माझी माती
इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं
कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर
भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार
य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान

देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?

"तथास्तु" म्हणाला नाही
सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला

0 comments:

Newer Post Older Post Home
Subscribe to PREMATME
Email:
Visit this group

Followers

About This Blog


Recent Comments