किती दिवस झाले
किती दिवस झाले ना
माझे मन धुंदावले नाही
कुठल्या गाण्याने वेडावले नाही
मोगऱ्यानेदेखील गंधाळले नाही
गाणीच चांगली नाहीत अताशा
मोगराही छान फ़ुलत नाही अताशा
आज मला आठवतीये ती अल्लड तू
पोक्तपणाच्या जळमटांमागची हुल्लड तू
पावसाच्या सरीने बेभान होणारी तू
ठेक्यावर थिरकणारी नादान तू
क्षितिजाकडे पाहात हरवणारी तू
चांदण्या डोळ्यात जागवत निजणारी तू
तेव्हाही तुला विचार होतेच
आता त्याची मतं झालीयेत
तेव्हाही तुझी आवड होतीच
आता मात्र तुझी निवड ठरलीये
तुझी रसिकतेची छिद्रं बुजलीयेत
दारं बंद करुन घेतलीस गीतं कुजलीयेत
बघ परत एकदा हात पसरुन
पाउस देईल तुला तुझं तळं
बघ परत एकदा खिडकीत बसून
आभाळ अजून आहे तसंच निळं
नव्या जाणीवेने बघ मोगरा हुंगून
खात्री आहे मला तो टाकेल मोहरून
बघ परत एकदा परतून
सापडशील बघ स्वत:ला
बघ तर परत एकदा हरवून
0 comments:
Post a Comment